सिडनी- नविन वर्ष २०२० मधील पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात आला. ३ जानेवारीला सिडनीच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया संघाने ४ दिवसात बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने हा सामना २७९ धावांनी जिंकला आणि न्यूझीलंडला ३ सामन्यांच्या मालिकेत 'व्हाईटवॉश' दिला. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या गुणातालिकेत बदल केले आहेत.
ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धची मालिका ३-० ने जिंकली. सद्या ऑस्ट्रेलिया कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणातालिकेत २९६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. तर भारतीय संघ ३६० गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. ऑस्ट्रेलिया संघाने १० कसोटीत ७ विजय, २ पराभव आणि एक अनिर्णीत सामन्यासह दुसरे स्थान कायम ठेवले आहे. भारतीय संघ मागील ७ सामन्यात अजेय ठरला आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजयी लय कायम राखल्यास आगामी काळात भारताचे अव्वल स्थान धोक्यात येऊ शकते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत क्लीन स्वीप मिळाल्यानंतर न्यूझीलंडचा संघ ५ व्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडने पाच सामन्यात एक विजय मिळवला आहे. तर राहिलेले चार सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमाकांवर अनुक्रमे पाकिस्तान आणि श्रीलंकेचा संघ आहे. दोनही संघाचे समान गुण आहेत. पण पाकिस्तानचा रनरेट चांगल्या असल्याने तो ८० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.