सिडनी- भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सद्या बुश फायर रिलीफ सामन्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. त्याला ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटर एलिस पेरीने एक षटक फलंदाजी करण्याची विनंती केली. तेव्हा तो पुन्हा हातात बॅट घेऊन मैदानात उतरला. पाँटिंग एकादश आणि गिलख्रिस्ट एकादश यांच्यातील चॅरिटी सामन्यातील इनिंग ब्रेकदरम्यान सचिनने एलिसच्या गोलंदाजीचा सामना केला. त्याने तिच्या पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार लगावला.
एलिस पेरीने एका व्हिडिओव्दारे सचिनला एक विनंती केली होती. त्यात ती म्हणते की, 'ऑस्ट्रेलियाच्या पुनर्वसनासाठी तू हातभार लावत आहेस, याचा मला आनंद आहे. तु आयोजित चॅरिटी सामन्यात एका संघाचा प्रशिक्षक आहेस. परंतु तुला पुन्हा फलंदाजी करताना आम्हाला पाहायला आवडेल. त्यामुळे तू चॅरिटी सामन्याच्या इनिंग ब्रेकमध्ये एक षटक खेळशील का ? या एका षटकातूनही आम्ही काही मदत उभी करणार आहे.'