अॅडलेड - येथील ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या पाकिस्तानविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत कांगारूनी एक डाव आणि ४८ धावांनी विजय मिळवला आहे. गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्यांदा डावाने विजय मिळवत कसोटी मालिका २-० ने खिशात घातली.
हेही वाचा -मनीष पांडेची नवी इनिंग.. 'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत अडकला लग्नाच्या बेडीत
विक्रमवीर डेव्हिड वॉर्नरच्या नाबाद त्रिशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव ५८९ धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात ३०१ धावांवर सर्वबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाने पाहुण्यांवर फॉलोऑन लादला. यासीर शहाच्या शतकी कामगिरीमुळे पाकिस्तानला या डावात तीनशेचा टप्पा ओलांडता आला.
फॉलोऑनच्या नामुष्कीतही पाकिस्तानचा संघ तग धरू शकला नाही. सोमवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी पाकिस्तान २३९ धावांवर बाद झाला. पाकिस्तानकडून दुसर्या डावात शान मसूदने ६८, असद शफीकने ५७ आणि मोहम्मद रिझवानने ४५ धावांचे योगदान दिले.
ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात नॅथन लायनने पाच, जोश हेझलवुडने तीन मिचेल स्टार्कला एक गडी बाद करता आला. ३३५ धावांच्या खेळीसह विक्रम नोंदवणारा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला सामनावीर आणि मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.