लंडन- लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर ८६ धावांनी मात केली. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने आपले गुणतालिकेतले अव्वल स्थान कायम राखले. ऑस्ट्रेलियाच्या २४४ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाने १५७ धावांपर्यंतच मजल मारली. ऑस्ट्रेलियाने हा सामना मिशेल स्टार्क आणि जेसन बेहरनडॉर्फने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर जिंकला. या सामन्यात स्टार्कने निम्मा संघ एकट्याने बाद केला.
ICC WC २०१९ : ऑस्ट्रेलियाचा ८६ धावांनी विजय, स्टार्कच्या माऱ्यापुढे न्यूझीलंडचे लोटांगण
आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर ८६ धावांनी मात केली.
आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुध्द न्यूझीलंड सामन्यात प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने २४३ धावा केल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी किवीच्या गोलंदाजांसमोर लोटांगण घातले. ऑस्ट्रेलिया संघाची ५ बाद ९२ अशी स्थिती असताना उस्मान ख्वाजा आणि अॅलेक्स कॅरे यांच्या अर्धशतकी खेळीने ऑस्ट्रेलियाने २४३ धावा केल्या. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी यावेळी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना जास्त काळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने यावेळी ४ बळी मिळवत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले.
ऑस्ट्रेलियाने दिलेले २४४ धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी न्यूझीलंड मैदानात उतरली. मात्र, त्यांची सुरूवात खराब झाली. हेन्री निकोलास आणि मार्टिन गुप्टील हे सलामीवीर बेहरनडॉर्फच्या गोलंदाजीवर माघारी परतले. यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये ५५ धावांची भागीदारी झाली. मात्र, स्टार्कने विल्यमसनला बाद करून ही जोडी फोडली. विल्यमसनने ४० धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर त्यांच्या डावाला गळती लागली. एकापाठोपाठ एक फलंदाज माघारी परतत राहिले. स्टार्कने भेदक मारा करत न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद केला. या पराभवामुळे न्यूझीलंडच्या उपांत्य फेरीतल्या स्थानाला धक्का पोहचला असून त्यांना आपल्या अखेरच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध विजय मिळवणे गरजेचे झाले आहे.