नवी दिल्ली - आयसीसी विश्वकरंडक २०१९ स्पर्धेत आपल्या वेगवान गोलंदाजीने, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंच्या मनात दहशत निर्माण केलेला ऑस्ट्रेलियाचा 'तेजतर्रार' गोलंदाज मिचेल स्टार्कने आयपीएल २०२० मधून माघार घेतली आहे. स्टार्कने १९ डिसेंबरला होणाऱ्या आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेतून आपले नाव माघार घेतले. दरम्यान, स्टार्कने मागील वर्षीच्या आयपीएलमधूनही माघार घेतली होती.
मिचेल स्टार्कने मागील वर्षी आयसीसी विश्वकरंडक २०१९ स्पर्धेच्या तयारीसाठी आयपीएलमधून माघार घेतली होती. विश्वकरंडक स्पर्धेत स्टार्क ऑस्ट्रेलिया संघाचा हुकमी एक्का ठरला. त्याने या विश्वकरंडक स्पर्धेत १० सामन्यात २७ गडी बाद केले. या कामगिरीसह तो एका विश्वकरंडकात सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्याच मॅकग्राच्या नावे होता. त्याने २००७ च्या विश्वकरंडकात २६ गडी बाद केले होते.
आयपीएल स्पर्धेत मिचेल स्टार्कने शेवटचा सामना २०१५ मध्ये रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाकडून खेळला होता. त्यानंतर २०१८ च्या आयपीएल हंगामात त्यांचा समावेश कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. मात्र, त्याला या हंगामातून दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. स्टार्कने आयपीएलमध्ये २७ सामने खेळली असून त्याने ३४ गड्यांना तंबूत माघारी धाडले आहे. १५ धावांवर ४ गडी बाद हे स्टार्कचे सर्वश्रेष्ठ आयपीएल प्रदर्शन आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३ व्या मोसमासाठी एकूण ९७१ खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी एक निवेदन पाठवून याविषयी माहिती दिली. नोंदणीची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०१९ होती. आता या महिन्याच्या १९ तारखेला कोलकातामध्ये लिलाव होणार आहे.