सिडनी - पाकिस्तानचा १६ वर्षीय वेगवान गोलंदाज नसीम शाह समोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. दिवस-रात्र कसोटी सामन्यात शाहने भेदक मारा करत ऑस्ट्रेलिया 'अ' संघाच्या फलंदाजाना चांगलेच अडचणीत आणले. महत्वाची बाब म्हणजे, सामन्यादरम्यान त्याच्या आईच्या निधन झाल्याची बातमी आली. असे असताना देखील केवळ संघाला आपली गरज आहे म्हणून त्यानं संघासोबतच राहण्याचा धाडसी निर्णय घेतला.
ऑस्ट्रेलिया अ आणि पाकिस्तान संघात तीन दिवसीय दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात नसीम शाहने आपल्या वेगवान गोलंदाजीने ऑस्ट्रेलिया अ संघाचे फलंदाज मार्कस हॅरिस आणि उस्मान ख्वाजाला चांगलेच सतावले. दोघेही शाहच्या गोलंदाजीचा सामना करण्यात असमर्थ ठरले. शाहच्या गोलंदाजीचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत शाह ख्वाजाला शॉर्ट पीच चेडू टाकताना दिसत आहे. या तीन दिवसीय सामन्यादरम्यान मंगळवारी नसीम शाहच्या आईचे निधन झाले. मात्र, तरीही त्याने सामना खेळला. दरम्यान, पाकिस्तानच्या खेळाडू शाहच्या आईला श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी काळी फिती बांधून मैदानात उतरले होते.