ऍडलेड ओव्हल - ऑस्ट्रेलिया-श्रीलंका संघामध्ये ३ सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने १३४ धावांनी जिंकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने नाबाद शतकी (१००) खेळी केली. त्याने आपला दुसरा सलामीवीर जोडीदार अॅरोन फिंच सोबत दमदार सलामी देत संघाला मोठी धावसंख्या उभारुन दिली. पण, ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या या सामन्यात श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज कसुन राजिता यांच्या नावे एक नकोसा विक्रम झाला आहे.
कसुन रजिताने आपल्या चार षटकाच्या स्पेलमध्ये मध्ये तब्बल ७५ धावा दिल्या. एखाद्या गोलंदाजाने कोणत्याही टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात चार ओव्हरमध्ये दिलेल्या सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड आहे. यापूर्वी, तुर्कीच्या तुन्हान तुरान याने झेक प्रजासत्ताकविरुध्द टी-२० सामन्यामध्ये ७० धावा लुटवण्याचा विक्रम नोंदवला होता.