सिडनी - यजमान ऑस्ट्रेलिया संघाने तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात, तिसऱ्या दिवसाअखेर २४३ धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा पहिला डाव २५१ धावात आटोपला. तेव्हा ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात बिनबाद ४० धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर (२३), जो बर्न्स (१६) नाबाद खेळत आहेत.
यजमान ऑस्ट्रेलिया संघाकडे २४३ धावांची आघाडी आहे. तीन दिवसाचा खेळ संपला असून आणखी दोन दिवस शिल्लक असल्याने ऑस्ट्रेलिया चौथ्या दिवशी न्यूझीलंडसमोर मोठे लक्ष्य देण्याच्या दृष्टीने खेळ करेल.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा नॅथन लिओनच्या फिरकीसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली. लिओनने ६८ धावा देत निम्मा संघ माघारी धाडला. न्यूझीलंडकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या ग्लेन फिलिप्सने ५२ धावांची खेळी केली. ग्लेन वगळता अन्य फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही.