सिडनी -क्रिकेट ऑस्ट्रेलियाने, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनीमध्येच खेळवला जाणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, सिडनीसह परिसरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. यामुळे हा सामना मेलबर्नमध्ये खेळवला जाणार असल्याची चर्चा होती. या संदर्भातील संकेत खुद्द क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. पण आता हा सामना सिडनीमध्येच होणार, हे स्पष्ट झाले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला ७ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. भारतीय संघाने दुसरा सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. यामुळे मालिकेत रंगत वाढली आहे.
ख्रिसमसच्या आधी, सिडनीच्या उत्तर भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. यामुळे सिडनी सामन्यावर अनिश्चिततेचे सावट होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा सामना नियोजित सिडनीमध्येच होईल, असे जाहीर केले आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकले यांनी सांगितले की, 'कोरोना महामारीच्या काळात अनेक संकटे असताना, आम्हाला सांगण्यास आनंद होतो की, क्रिकेट ऑस्ट्रेलिया ही मालिका नियोजित ठिकाणी खेळवण्याच्या वाटेवर आहे. आम्ही तिसरा सामना नियोजित सिडनीमध्येच आयोजित करणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही सिडनी आणि ब्रिस्बेन येथील चौथा सामना सुरक्षित आणि यशस्वीपणे खेळवू.'