सिडनी - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांची हुल्लडबाजी थांबण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. शनिवारी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांवर प्रेक्षकांनी वर्णद्वेषी टीका केली. याची तक्रार करण्यात आली आहे. अद्याप हे प्रकरण मिटलेले नसताना, पुन्हा आज (रविवार) प्रेक्षकांनी वर्णद्वेषी टीका केल्याचे समोर आले आहे.
चौथ्या दिवशी चहापानआगोदर ८६ व्या षटकात हा प्रकार घडला. गोलंदाजी केल्यानंतर मोहम्मद सिराज क्षेत्ररक्षणासाठी सीमारेषेजवळ थांबला असता, तेथील काही प्रेक्षकांनी पुन्हा सिराजवर वर्णद्वेषी टीका केली. तेव्हा सिराजने हा प्रकार पंचांना सांगितला. यावेळी कर्णधार अजिंक्य रहाणेही भडकला आणि त्याने त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. तेव्हा पंचांनी काही वेळासाठी सामना थांबवला. सिराजने वर्णद्वेषी टीका करणाऱ्या प्रेक्षकाची माहिती इशारा करत सुरक्षा रक्षकांना दिली. तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्या प्रेक्षकांना मैदानाबाहेर काढले. यानंतर सामन्याला सुरूवात झाली.
शनिवारी हा प्रकार घडल्यानंतर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी क्रिकेट एक जंटलमन खेळ आहे. यात अशा गोष्टींना थारा नाही, असे म्हटलं आहे. याशिवाय त्यांनी बोर्डाचे सचिव जय शाह यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. ते खेळाडूंच्या संपर्कात आहेत, असे देखील स्पष्ट केले आहे.