मेलबर्न - अॅडलेड कसोटीतील पराभवानंतरही भारतीय संघात असे खेळाडू आहेत, जे राहिलेल्या मालिकेत उलटफेर देखील करू शकतात, असे मत ऑस्ट्रेलिया संघाचे माजी प्रशिक्षक डेरेन लेहमन यांनी व्यक्त केले. भारतीय संघ अॅडलेड कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात ३६ धावांवर ऑलआऊट झाला आणि ऑस्ट्रेलिया संघाने हा सामना ८ गडी राखून जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. यावर लेहमन यांनी सांगितलं की, भारतीय संघासाठी पुनरागमन करणे कठीण आहे. पण भारतीय संघात असे खेळाडू आहेत की, जे बाजी पलटवू शकतात.
एका क्रीडा संकेतस्थळाशी बोलताना लेहमन म्हणाले की, भारतीय संघाकडे भेदक मारा करणारे गोलंदाजी आक्रमण आहे. जर भारतीय फलंदाजांनी उसळी घेणाऱ्या चेंडूचा यशस्वी सामना केला तर ते मालिकेत वापसी करू शकतात.
भारतीय संघ नक्कीच गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणू शकतो. पण ते उसळी घेणाऱ्या गोलंदाजीचा सामना करू शकतात की नाही पाहावे लागेल. एमसीजीची खेळपट्टी सपाट असल्याने भारतीय फलंदाजांसाठी ही खेळपट्टी अनुकूल ठरू शकते. यावर भारतीय फलंदाज धावा करण्यात खास करून पहिल्या डावात यशस्वी ठरतील का? हे पाहावे लागेल, असे देखील लेहमन यांनी सांगितलं.