कराची- आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) २०२० मध्ये होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला दिले आहे. याप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय क्रिकेट बोर्डाला पाकिस्तानमध्ये खेळणार की नाही, याची विचारणा केली आहे. दरम्यान, ही स्पर्धा पाकिस्तानात झाल्यास, सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पीसीबीचे सीईओ वसिम खान यांनी सांगितले, की 'पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत, भारतीय संघ पाकिस्तानला येणार की नाही. या विषयी आम्ही बीसीसीआयला विचारणा केली आहे. याबाबत बीसीसीआय राजी आहे की नाही हे पहिले पाहावे लागेल. या स्पर्धेला अद्याप बराच अवधी असून आम्ही बीसीसीआयच्या उत्तराची वाट पाहत आहोत. पण, जूनपर्यंत आम्हाला हे माहित असले पाहिजे, की या स्पर्धेचे ठिकाण कोठे असणार आहे. जर भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला तर ही स्पर्धा कोठे होईल, याबद्दल सांगणं कठिण आहे.'