नवी दिल्ली - यंदाच्या आयपीएलचा महेंद्रसिंह धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीशी काही संबंध नाही, असे वक्तव्य माजी भारतीय वेगवान गोलंदाज आशिष नेहराने केले आहे. गेल्या वर्षी विश्वकरंडकामध्ये धोनीने न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता, तेव्हापासून तो संघाबाहेर आहे.
वर्षभरापासून क्रिकेट न खेळलेल्या धोनीला यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. या स्पर्धेद्वारे तो भारतीय संघात परत स्थान मिळवू इच्छित आहे. याबाबत नेहराने आपली प्रतिक्रिया दिली.
नेहरा म्हणाला, "यंदाच्या आयपीएलचा महेंद्रसिंह धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीशी काही संबंध नाही. जोपर्यंत मी त्याला ओळखतो, धोनीने आपला शेवटचा सामना भारतासाठी आनंदाने खेळला आहे. त्याला काही सिद्ध करण्याची गरज नाही. त्याने निवृत्ती घेतली नसल्याने मीडिया चर्चा करत आहे. शेवटी याविषयी तोच व्यवस्थित सांगू शकेल.''
''माझ्यासाठी धोनीचा खेळ हा उच्च स्तरावर राहिला आहे. मागील विश्वकरंडकामध्ये तो मैदानात होता तोपर्यंत अंतिम सामन्यात पोहोचता येणे शक्य होते. मात्र, तो बाद झाला आणि सर्व आशा मावळल्या'', असेही नेहराने सांगितले.
यंदाची आयपीएल स्पर्धा 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) खेळवली जाणार आहे.