लीड्स- अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडचा पहिला डाव जोश हॅझलवूडच्या भेदक माऱ्यासमोर ढेपाळला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या ६७ धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना मार्नस लॅबूशेनच्या अर्धशतकाच्या जोरावर ५६ षटकात ६ बाद १७० धावा केल्या आहेत. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियन संघाकडे एकूण २८३ धावांची आघाडी झाली आहे.
वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याच्या भेदक माऱ्याच्या जोरावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १७९ धावांवर रोखले. आर्चरने ४५ धावांमध्ये ऑस्ट्रेलियाचे ६ गडी तंबूत धाडले. मात्र, याचा फायदा इंग्लंडच्या फलंदाजांना उठवता आला नाही. कर्णधार जो रुट सलग दुसऱ्यांदा भोपळा फोडण्यात अपयशी ठरला. त्यामुळे उपाहारानंतर काही मिनिटांतच इंग्लंडचा पहिला डाव संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून हॅझलवूडने ३० धावांमधये ५ बळी घेतले. तर त्याला पॅट कमिन्स (३/२३) आणि जेम्स पॅटिन्सन (२/९) यांची साथ मिळाली.