लंडन- क्रिकेटची 'पंढरी' लॉर्ड्स मैदानावर रंगलेला अॅशेस मालिकेतील दुसरा सामना अनिर्णीत राहिला. यजमान इंग्लंडने पाचव्या दिवशी (रविवारी) बेन स्टोक्सच्या नाबाद ११५ धावांच्या मदतीने दुसरा डाव ५ गडी बाद २५८ धावांवर घोषित केला आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २६७ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, अंतिम दिवसाचा खेळ संपताना ऑस्ट्रेलियाने ४७.३ षटकात ६ गडी बाद १५४ धावा केल्या. यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला. दरम्यान, ऑस्ट्रेलिया मालिकेत १-० ने आघाडीवर आहे.
इंग्लंडने दिलेल्या २६७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाची अवस्था खराब झाली होती. दुसऱ्या डावाच्या सुरुवातीलाच अवघ्या ४७ धावांमध्ये ऑसीचे ३ गडी बाद झाले. वार्नर, बेनक्रॉफ्ट आणि ख्वाजा परतल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ अडचणीत आला. तेव्हा सामन्यात आर्चरचा चेंडू लागून रिटायर्ड हर्ट झालेल्या स्टिव स्मिथच्या ठिकाणी संघात सहभागी झालेला मार्नस लाबुशेन याने अर्धशतक झळकावले. त्याने हेडसोबत चौथ्या विकेटसाठी ८५ धावांची भागिदारी करत संघाला पराभवाच्या छायेतून बाहेर काढले.