नवी दिल्ली - इंग्लंड विरुध्द ऑस्ट्रेलिया संघातील अॅशेस मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर दुसरा सामना अनिर्णीत राहिला. मात्र, मालिकेत दोन्ही संघाने केलेला खेळ उच्च दर्जाचा होता. या शानदार खेळाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीसह क्रिकेट चाहते प्रभावित झाले आहेत. अॅशेसमधील खेळ पाहून गांगुलीने दोन्ही संघाचे ट्विट करत कौतुक केले आहे.
अॅशेसमधील दोन्ही संघाचा खेळ पाहून गांगुली म्हणतो, 'अॅशेस मालिकेने कसोटी क्रिकेटला जिंवत ठेवले आहे. आता अन्य संघांना त्यांचा स्तर उंचवण्याचे आव्हान आहे.' अशा आशयाचे ट्विट त्याने केले आहे.
दरम्यान, इंग्लंडने विश्वकरंडक स्पर्धा जिंकल्यानंतर, अॅशेसमध्ये यजमानांचे पारडे जड असल्याचे बोलले जात होते. मात्र, चेंडू छेडछाड प्रकरणात शिक्षा भोगून संघात परतलेला स्टिव स्मिथने इंग्लंडला स्पर्धेत चांगलेच सतावले. त्याने पहिला कसोटीतील दोन्ही डावांमध्ये शतकी खेळी केली. याच खेळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिला सामना २५१ धावांनी जिंकला.
दुसरा कसोटी सामन्यात इंग्लंडने पुनरागमन करत ऑस्ट्रेलियावर दडपण आणले होते. मात्र, स्मिथने पुन्हा पहिल्या डावात ९२ धावांची खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने सांघिक करत सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. त्यामुळे ५ सामन्यांच्या या कसोटी मालिकेत सध्या ऑस्ट्रेलिया १-० अशा फरकाने आघाडीवर आहे.
अॅशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना २२ ऑगस्टपासून सुरु होणार असून हा सामना हेडिंग्ले, लीड्स येथील मैदानात खेळवला जाणार आहे.