नवी दिल्ली - देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते अरुण जेटली यांचे आज (२४ ऑगस्ट) दीर्घ आजाराने निधन झाले. ते मृत्यू समयी ६६ वर्षाचे होते. जेटली यांच्या निधनानंतर क्रीडा विश्वातून शोक व्यक्त होत आहे.
अरुण जेटली यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने ९ ऑगस्टला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार करण्यात आले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली नोटाबंदी आणि जीएसटी यासारखे धाडसी निर्णय राबवणारे भारताचे अर्थमंत्री म्हणून प्रकाशझोतात होते.
अरुण जेटली यांच्या मृत्यूनंतर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरसह विरेंद्र सेहवागने ट्विट करत शोक व्यक्त केला. अरुण जेटली हे तब्बल १३ वर्षे दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांनी १९९९ ते २०१२ पर्यंत दिल्ली क्रिकेट संघटनेचा कारभार पहिला होता.
क्रिकेटर तथा भाजप खासदार गौतम गंभीर याने ट्विट केले आहे. त्यात तो म्हणतो, 'वडिल आपल्याला बोलायला शिकवतात. तर वडिलासमान असलेली व्यक्ती आपल्याला कसे बोलावे हे शिकवते. एक वडिल आपल्याला चालायला शिकवतात तर वडिलासमान असलेली व्यक्ती आपल्याला कसे चालावे हे शिकवते. एक वडिल आपल्याला नाव देतो, तर वडिलासमान असलेली व्यक्ती आपल्याला ओळख देते. वडिलासमान असलेले अरुण जेटली आता या जगात नाहीत. माझ्या शरीरातील एक भाग आज निखळला. सर, तुमच्या आत्म्यास शांती लाभो.' अशा आशयाचे ट्विट गंभीरने केले आहे.
विरेंद्र सेहवाग - अरुण जेटली यांच्या जाण्याचे दु:ख आहे. दिल्लीच्या क्रिकेटपटूंसाठी त्यांनी खूप काही केले. एक काळ असा होता की दिल्लीच्या क्रिकेटपटूंना उच्च स्तरावर खेळण्याची संधी मिळत नव्हती. तेव्हा, जेटलींनी आपल्या नेतृत्वात दिल्लीच्या क्रिकेटपटूंना संधी उपलब्ध करुन दिली. ते खेळाडूंच्या समस्या जाणून घेत असत आणि त्या समस्यांचे निराकरणही ते करत होते. जेटली यांच्या दुःखात मी त्यांच्या कुंटुबीयासोबत आहे.