नवी दिल्ली -आगामी विंडीज दौऱ्यासाठी बीसीसीआयने काल रविवारी भारतीय संघाची घोषणा केली. या दौऱ्यात महेंद्रसिंह धोनी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. धोनी दोन महिने क्रिकेटपासून दूर राहणार असून या दोन महिन्यात तो सैन्य दलातील पॅरा मिलिट्रीच्या तुकडीमध्ये सामिल होणार आहे. यासाठी त्याने भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्याकडे सैन्यासोबत सराव करण्याची परवानगी मागितली होती. ही परवानगी आता धोनीला मिळाली आहे.
लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी धोनीला सैन्यासोबत सराव करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, त्याला लष्कराच्या मोहिमांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येणार नाही. धोनी जम्मू आणि काश्मिरच्या पॅराशूट रेजिमेंटमधून सराव करणार आहे.
2011 मध्ये विश्वकरंडक जिंकल्यानंतर भारतीय प्रादेशिक सेनेने भारतीय संघाचा तत्कालिन कर्णधार महेंद्रसिंह धोनीला 'लेफ्टनंट कर्नल' ही मानद उपाधी दिली होती. नोव्हेंबर 2011 मध्ये धोनीला प्रादेशिक सेनेकडून लेफ्टनंट कर्नल या मानद पदाने सन्मानित करण्यात आले. धोनी कपिल देवनंतर हा सन्मान मिळवणारा दुसरा क्रिकेटपटू ठरला होता.
विंडिज दौऱ्यासाठी पंतला संधी -
निवड समितीने तिन्ही प्रकारात महेंद्रसिंह धोनीच्या ठिकाणी ऋषभ पंतला जागा दिली आहे. 'धोनी विंडीज दौऱ्यासाठी उपलब्ध नसून त्याठिकाणी पंतला तिन्ही प्रकारात जागा देण्यात आली. विश्वकरंडक स्पर्धेसाठी आम्ही चांगली संघबांधणी केली होती. त्यानंतर आताही आम्ही नविन खेळाडूंना संघात सहभागी करुन संघबांधणी करत आहोत. विश्वकरंडकात पंतची कामगिरी इतकी वाईटही नव्हती. ज्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवण्यात यावे, याकारणाने आम्ही त्याला संघात सामिल केले', असे प्रसाद म्हणाले.