मुंबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरूवात झाली असून पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्सला धूळ चारत उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्जने जिंकला. कोरोना काळात सुरू असलेल्या या स्पर्धेत कोणता संघ विजेता ठरणार? याची चर्चा जोरात सुरू आहे. याविषयी भारताचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरला विचारले असता, त्याने मुंबई इंडियन्सचा संघच चॅम्पियन ठरु शकतो, असे सांगितले.
एका यूट्यूब मुलाखतीत सचिन तेंडुलकर भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रासोबत बोलत होता. त्यावेळी त्याला यंदाचे जेतेपद कोणता संघ पटकावेल, असे विचारले असता सचिन म्हणाला, निश्चितच मुंबई इंडियन्सचा संघ विजेता ठरेल, काही शंका आहे का? मी नेहमी सर्वच ठिकाणी निळ्या रंगाच्या जर्सीवर राहिलो आहे. मुंबई आणि इंडियन्स एकत्रित येतात, तेव्हा मुंबई इंडियन्स होते.
दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा आयपीएल हंगाम यूएईमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यात सचिन मुंबई इंडियन्स संघासोबत नाही. पण त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर संघासोबत नेट गोलंदाज म्हणून गेला आहे. सचिन मुंबईसाठी पहिल्या सहा सत्रात खेळला आहे. मात्र, तो संघात असताना मुंबई इंडियन्सचा संघ कधीही आयपीएल चॅम्पिअन ठरलेला नाही.