मुंबई - भारतीय संघाने वेस्ट इंडीज विरुद्धची टी-२० मालिका २-१ ने जिंकली. मुंबईतील अखेरच्या निर्णायक सामन्यात भारतीय संघाने विंडीजवर ६७ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात के एल राहुल, रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांनी अर्धशतकं झळकावली. दरम्यान, मुंबईत खेळवण्यात आलेल्या या सामन्यात रोहितची पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरा यांनी हजेरी लावली होती. तेव्हा सामन्यादरम्यान, रोहित मुलगी समायरा हिच्यासोबत मस्ती करताना दिसून आला. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई इंडियन्सनने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन रोहितचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात रोहित ड्रेसिंग रुममधून दुसऱ्या स्टँडमध्ये बसलेली आपली मुलगी समायरा हिच्याशी मस्ती करताना दिसत आहे. मुंबईतील सामना पाहण्यासाठी रोहितची पत्नी रितिका मुलगी समायरा हिच्यासोबत आली होती. मात्र, त्या दोघीही ड्रेसिंग रुमच्या जवळ असलेल्या स्टँडमध्ये बसल्या होत्या. तेव्हा रोहित ड्रेसिंग रुममधून समायराशी मस्ती करताना दिसला.