कोलंबो - पाकिस्तान विरोधातील २ सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेने आपला संघ जाहीर केला आहे. माजी कर्णधार दिनेश चंडीमलचे १० महिन्यानंतर संघात पुनरागमन झाले आहे. लंकेच्या १६ सदस्यीस संभाव्य संघात चंडीमलचा समावेश करण्यात आला असून चंडीमलने आपला शेवटचा कसोटी सामना फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुध्द खेळला होता.
श्रीलंकेचा संघ डिसेंबर महिन्यात कसोटी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार आहे. उभय संघात या मालिकेतील पहिला सामना ११ डिसेंबरला रावलपिंडीच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये तब्बल १० वर्षानंतर आंतरराष्ट्रीय कसोटी सामना होत आहे. यापूर्वी २००९ साली पाकिस्तानमध्ये अखेरचा कसोटी सामना झाला होता.
विशेष म्हणजे, श्रीलंके विरुध्दच्या त्या सामन्यादरम्यान, खेळाडूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. दहशतवादी हल्ल्यानंतर ऑक्टोबरमध्ये झालेल्या पाकिस्तान दौऱ्याला जाण्यास श्रीलंका संघातील मुख्य खेळाडूंनी नकार दिला. तेव्हा श्रीलंकन बोर्डाने ९ मुख्य खेळाडूंना विश्रांती देत दुसरा संघ पाठवला होता. या संघाने पाकिस्तान विरुध्दची टी-२० आणि एकदिवसीय मालिकाही जिंकली होती.