लंडन -इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉसची ईसीबीच्या क्रिकेट समितीच्या चेअरमनपदी निवड झाली आहे. काही दिवसांपूर्वीच इंग्लंडचे माजी कर्णधार जेफ्री बॉयकॉट आणि इंग्लंडला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवून दिलेला माजी कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉस या दोघांना 'नाइटहुड' (Knighthood) या उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे. या दोघांनी क्रीडा क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिल्याने त्याचा हा सन्मान करण्यात आला आहे.
हेही वाचा -तीन मुलांची आई किम क्लाइस्टर्स टेनिसच्या मैदानावर परतणार
४२ वर्षीय स्ट्रॉस याने २०१५ ते २०१८ पर्यंत इंग्लंडच्या मार्गदर्शकाची जबाबदारी घेतली होती. पत्नी रुथच्या आजारपणामुळे त्याने पदाचा राजीनामा दिला होता. फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे रुथचे निधन झाले होते. 'या क्षेत्रात पुनरागमन केल्याने आनंद होत आहे', असे स्ट्रॉसने निवड झाल्यानंतर म्हटले आहे.
अँड्र्यू स्ट्रॉस याने २००४ साली न्यूझीलंड संघाविरुध्द पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. या सामन्यात त्याने शतकी खेळी केली. असा कारनामा करणारा तो जगातील चौथा खेळाडू आहे. २००५ मध्ये इंग्लंडने तब्बल १८ वर्षानंतर अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. स्ट्रॉस हा या विजयी संघाचा सदस्य होता. महत्वाचे म्हणजे या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात स्ट्रॉसने १०६ आणि पाचव्या कसोटी सामन्यात १२९ धावांची खेळी केली होती.
२००९ मध्ये स्ट्रॉसकडे इंग्लंड संघाचे कर्णधारपद देण्यात आले. तेव्हा त्याने इंग्लंड संघाला कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवून दिला होता. स्ट्रॉसने ५० कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचे नेतृत्व केले आहे. यात इंग्लंडने २४ सामने जिंकले आहेत. तर ११ सामन्यामध्ये इंग्लंडला पराभूत व्हावे लागले आहे. दरम्यान, स्ट्रॉसच्या मार्गदर्शनात इंग्लंडने पहिल्यादाच २०१९ मध्ये विश्वकरंडक उंचावला आहे.