कोलकाता - भारतामध्ये प्रथमच होणाऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्याला ईडन गार्डन्स मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हजर राहणार आहेत. २२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान, भारत आणि बांगलादेश संघात रंगणाऱ्या ऐतिहासिक सामन्याला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
भारत आणि बांगलादेश संघात २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना इंदूरच्या होळकर मैदानावर रंगला आहे. पण आतुरता दुसऱ्या सामन्याची आहे. कारण हा सामना दिवस-रात्र खेळवण्यात येणार आहे. दोन्ही देशांसाठी हा महत्त्वाचा क्षण असल्याचे म्हटले जात आहे.
बीसीसीआयने काही वर्षांपासून दिवस-रात्र कसोटी सामन्याला नकार दिला होता. मात्र, सौरव गांगुलीने बीसीसीआय अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर, संघटनेत अनेक बदल होताना दिसत आहेत.