मुंबई- सध्या कोरोनाने जगाला वेठीस धरले आहे. भारताचा पारंपरिक शेजारी पाकिस्तानातही कोरोनामुळे लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. प्रत्येक देश आपापल्या परीने यावर उपाययोजना करत आहे. या कामी सर्व स्तरातून मदतनिधीचा ओघ सुरू आहे. अशा परिस्थितीत कोरोनाविरुद्ध लढ्यात निधी उभारण्यासाठी भारत-पाकिस्तान मालिका खेळवण्यात यावी, असा प्रस्ताव पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने मांडला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्वंद्व जगजाहीर आहे. या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील क्रिकेट सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रीडाप्रेमी उत्सुक असतात. मैदानावरील दोन देशांमधील लढाई पाहण्यासाठी चाहत्यांच्या अक्षरश: उड्या पडतात. पण पाकिस्तानातून दहशतवादी कुरापतींना मिळणाऱ्या खतपाण्यामुळे भारताने शेजाऱ्यांशी सर्व संबंध तोडले आहेत. त्यामुळेच उभय देशांमध्ये तेरा वर्षांपासून द्विदेशीय क्रिकेट मालिका झालेली नाही. पण, आता कोरोनाच्या लढ्यात निधी उभारण्यासाठी शोएब अख्तरने भारत-पाकिस्तान यांच्यात ३ सामन्याची मालिका खेळवण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
शोएब अख्तरने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, 'कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हा काळ सर्वांसाठी खडतर आहे, अशा परिस्थितीत मी दोन्ही देशांमध्ये ३ सामन्यांची मालिका खेळवण्यात यावी, असा पर्याय सुचवतो.'