मुंबई -भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीनंतर धोनीच्या क्रिकेट विश्वातील आठवणींचे जतन करण्यात यावे, अशी मागणी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य अजिंक्य नाईक व धोनी चाहत्यांनी असोसिएशनकडे केली आहे.
अजिंक्य नाईक यांनी मुंबई असोसिएशनला त्याबाबत पत्रही लिहिलं आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, 'धोनीने 2011 च्या विश्वकरंडकात श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात विजयी षटकार मारला होता. तो चेंडू मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वस्तुसंग्रहालयात ठेवावा. तसेच वानखेडे स्टेडियममध्ये ज्या ठिकाणी तो चेंडू गेला तिथे त्या आसनाला रंग देऊन, ते आसन कायमस्वरुपी राखीव ठेवण्याची मागणी, अजिंक्य नाईक व धोनी चाहत्यांनी केली आहे. धोनीने २०११ च्या विश्वकरंडातील अंतिम सामन्यात षटकार खेचला तो क्षण... महेंद्रसिंह धोनीचं भारतीय क्रिकेटमधील योगदान महत्वपूर्ण आहे. त्याचा सन्मान म्हणून या मागण्या अजिंक्य नाईक व त्यांच्या चाहत्यांनी केल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे त्या मागण्याविषयी एमसीएच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
धोनीने १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने इंन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये धोनीच्या कारकिर्दितील छायाचित्रे आहेत. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला 'कभी कभी' या चित्रपटातील 'मैं पल दो पल का शायर हूं...' हे गायक मुकेश यांच्या आवाजातील गीत ऐकायला मिळते. हा व्हिडिओ 4 मिनिट आणि 7 सेकंदाचा आहे. याद्वारे महेंद्र सिंह धोनीने त्याच्या कारकिर्दितील आठवणींना उजाळा दिला आहे.
हेही वाचा -दक्षिण आफ्रिकेचे दोन खेळाडू कोरोनाबाधित
हेही वाचा -IPL 2020 : 'युएई रेडी'; राजस्थान, पंजाब संघ युएईला रवाना