नवी दिल्ली - मुंबईविरुद्ध निर्णायक खेळी करणाऱ्या अंबाटी रायुडूबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने मोठे विधान केले आहे. जी हुजूर करत कर्णधाराच्या मागे न फिरल्याने रायुडूला भारतीय संघातून बाहेर जावे लागले, असा गंभीर आरोप अजय जडेजाने केला आहे.
एका क्रीडा संकेतस्थळाच्या कार्यक्रमात बोलताना अजय जडेजा म्हणाला, रायुडूची एकदिवसीय क्रिकेटमधील सरासरी ५०च्या आसपास होती. एवढी सरासरी मोठमोठ्या खेळाडूंची सुद्धा नाही. पण जेव्हा संघाचा कर्णधार बदलतो, तेव्हा हुजरेगिरी करत नाहीत असे खेळाडू संघाबाहेर होतात. मला वाटतं रायुडू त्याच खेळाडूंपैकी एक आहे.
दरम्यान, रायुडूला इंग्लंडमध्ये २०१९मध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले नव्हते. यावर अनेक दिग्गज खेळाडूंनी टीका करत आश्चर्य व्यक्त केले होते. त्याच्या जागेवर निवड समितीने, विजय शंकर आणि ऋषभ पंत यांना संधी दिली. मात्र या दोघांनाही विश्वकरंडक स्पर्धेत आपली छाप सोडता आली नाही. याचाच फटका भारतीय संघाला बसला आणि भारतीय संघ विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीत बाद झाला.