दुबई - विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने वेस्ट इंडीज विरुद्धची ३ सामन्यांची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली. विराटने या मालिकेत दमदार प्रदर्शन करत मालिकावीरचा पुरस्कार पटकावला. याच कामगिरीचा फायदा विराटला आयसीसी क्रमवारीत झाला आहे. त्याने आयसीसी क्रमवारीत १५ व्या स्थानावरून थेट दहाव्या स्थानावर उडी मारली आहे. दरम्यान, विराटसह लोकेश राहुलला याचा फायदा झाला तर रोहित शर्माची मात्र, घसरण झाली आहे.
विराट कोहलीने वेस्ट इंडीज विरुध्दच्या टी-२० मालिकेत पहिल्या सामन्यात नाबाद ९४, दुसऱ्या सामन्यात १९ तर तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात नाबाद ७० धावांची खेळी केली. विराटला या कामगिरीमुळे मालिकावीर पुरस्कारनं गौरविण्यात आले. याचा फायदा विराटला आयसीसी टी-२० क्रमवारीत झाला आहे. विराट मालिकेआधी १५ व्या स्थानावर होता. आता मालिकेनंतर टॉप-१० मध्ये दाखल झाला आहे. त्याच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे.