नवी दिल्ली -पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. यावेळीही तो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. आगामी पाकिस्तानच्या दौऱ्यासाठी श्रीलंकेच्या काही क्रिकेटपटूंनी पाकचा दौरा न करण्याचे ठरवले होते. या खेळाडूंनी पाकिस्तानात जाण्यास का मनाई केली याचे कारण आफ्रिदीने शोधले आहे.
हेही वाचा -विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप : फायनलमध्ये प्रवेश करणारा अमित पांघल ठरला पहिलाच भारतीय खेळाडू
आफ्रिदीने या प्रकरणासंबंधी इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल) स्पर्धेला जबाबदार ठरवले आहे. 'आयपीएल लंकेच्या खेळांडूवर दबाव टाकत असल्यामुळे ते पाकिस्तानात खेळण्यास टाळाटाळ करत आहेत', असे आफ्रिदीने म्हटले आहे. आफ्रिदी पुढे म्हणाला, 'मी आधी लंकेच्या खेळांडूशी चर्चा केली होती. तेव्हा हे सर्व खेळाडू पीएसएलमध्ये खेळण्यास तयार होते. परंतु, जर तुम्ही पाकिस्तानात गेलात तर आम्ही तुमच्यासोबत करार करणार नाही असे आयपीएलकडून त्यांना सांगण्यात आले आहे.'
'पाकिस्तानने नेहमीच लंकेच्या खेळाडूंचे समर्थन केले आहे. लंकेच्या क्रिकेट बोर्डानेही त्यांच्यावर पाकिस्तानसोबत खेळण्याचा दबाव टाकला पाहिजे. लंकेचे खेळाडू इथे आले तर इतिहासात नेहमीत त्यांचे नाव घेतले जाईल.' असेही आफ्रिदी म्हणाला आहे.
तत्पूर्वी पाकिस्तानचे मंत्री फवाद हुसैन चौधरी यांनीही असाच आरोप केला होता. श्रीलंका कराची आणि लाहोरमध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे.