लखनऊ - 'झटपट' क्रिकेटमध्ये घातक समजल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला अफगाणिस्तानने पराभवाचे पाणी पाजले आहे. लखनऊ येथे दोन्ही संघांमध्ये झालेल्या तिसऱ्या टी -२० सामन्यात अफगाणिस्तानने विंडीजचा २९ धावांनी पराभव केला आणि मालिका २-१ ने खिशात घातली.
हेही वाचा -स्वत:च्या भावाचा 'झेल' घेताना ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूचं फुटलं नाक!.. पाहा व्हिडिओ
लखनऊच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने सांघिक कामगिरीचे दमदार प्रदर्शन केले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या अफगाणिस्तानने विंडीजसमोर खेळताना ८ गड्यांच्या मोबदल्यात १५६ धावा रचल्या. अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली. सलामीवीर हजरत जजई (०), करीम जनत (२) आणि इब्राहिम जादरान (१) धावांवर बाद झाले. मात्र, रहमानहुल्लाह गुरबाजने ५२ चेंडूत ७९ आणि असगर अफगान २४ धावांची खेळी साकारत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. विंडीजकडून कीमो पॉल, केसरिक विलियम्स, शेल्डन कॉटरेल यांनी प्रत्येकी २ तर कायरन पोलार्डने १ गडी बाद केला.
या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजच्या संघाला २० षटकांत ७ बाद १२७ धावसंख्येपर्यतच मजल मारता आली. विंडीजची सुरुवातही खराब झाली. १६ धावसंख्येवर विंडीजचे २ फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या एविन लुइसने २३ चेंडूत २४ आणि शाइ होपने ४६ चेंडूत ५२ धावा करत संघास विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पण ते अपयशी ठरले. अफगाणिस्तानकडून नवीन उल हकने ४ षटकांत २४ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. मुजीब उर रहमान, करीम जनत, गुल्बदीन नाएब आणि राशिद खान यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
अफगाणिस्तानच्या रहमानहुल्लाह गुरबाजला सामनावीर तर, करीम जनतला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.