मेलबर्न- आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत थायलंड विरुद्ध पाकिस्तान या संघातील सामना पावसामुळे रद्द झाला. मंगळवारी सिडनीमध्ये झालेल्या या सामन्यात दोनही संघांना प्रत्येकी १-१ गुण मिळाले. थायलंडचा डाव संपल्यानंतर पावसाने हजेरी लावली. तेव्हा थायलंडच्या महिला खेळाडूंनी मैदानातच डान्स करण्यास सुरूवात केली. टी-२० विश्व करंडकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन थायलंडच्या खेळाडूंचा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. तो व्हिडिओ पाहून अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान थायलंडच्या खेळाडूंचा 'फॅन' झाला आहे.
थायलंडचा महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच विश्वकरंडक स्पर्धेत सहभागी झाला आहे. त्यांना तीन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. अखेरच्या पाकिस्तानविरुद्ध सामन्यात थायलंडने दमदार फलंदाजी केली. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद १५० धावा केल्या. ही त्यांची टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्या ठरली. पाक विरुद्धच्या सामन्यात नथाकन चँटम आणि नताया बुचाथम या सलामीवीर जोडीने ९३ धावांची सलामी दिली.