नवी दिल्ली -क्रीडा साहित्य बनवणाऱ्या दोन अग्रेसर कंपन्या आदिदास आणि पुमा हे एका नव्या शर्यतीत उतरले आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या किट प्रायोजकासाठी या दोन कंपन्यांमध्ये द्वंद्व रंगले आहे. टीम इंडिया आणि सध्याची किट प्रायोजक कंपनी नाईकी यांचा १४ वर्षांचा करार सप्टेंबर-२०२० मध्ये संपणार आहे.
बीसीसीआयच्या कार्यकारिणीने वृत्तसंस्थेला सांगितले, की आदिदास आणि पुमा यांनी भारतीय संघाचे किट प्रायोजक होण्यात रस दर्शवला आहे. करार काहीही असो संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक होईल. याशिवाय ड्रीम-११ ही आणखी एक कंपनी असू शकते.
एका वृत्तानुसार, २०१६ मध्ये नाईकीने आपल्या कराराचे ३७० कोटींमध्ये नूतनीकरण केले होते. नाईकी प्रत्येक सामन्यासाठी ८७,३६,००० रुपये देत होती. कोरोनामुळे उ्दभवलेल्या बाजाराच्या परिस्थितीमुळे नाईकी पुन्हा या रकमेवर करार करणे कठीण आहे. इतर कंपन्यांनाही संधी मिळण्यासाठी बीसीसीआय निविदा काढेल.
आदिदास आणि पुमाचा भारतातील प्रभाव मोठा आहे आणि या दोन्ही ब्रँडचा भारतातही मोठा चाहतावर्ग आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली आणि स्टार फलंदाज केएल राहुल पुमाचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. मागील चक्रात बीसीसीआयने प्रति सामन्यासाठीची बोली किंमत ८८ लाख रुपये ठेवली होती, जी आता ६१ लाखांवर आली आहे.