अहमदाबाद - भारत आणि इंग्लंड यांच्यात उद्या (ता. २४) पासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये डे-नाइट कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. हा सामना गुलाबी चेंडूवर खेळला जाणार आहे. विशेष म्हणजे, मागील इतिहास पाहता गुलाबी चेंडूवर दोन्ही संघाची कामगिरी चांगली राहिलेली नाही. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडलेड कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात ३६ धावांत ऑलआउट झाला होता. तर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात गुलाबी चेंडूवर इंग्लंडचा डाव ५६ धावांत आटोपला होता. याच बाबतीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सामन्याआधी बातचित केली.
विराट म्हणाला, 'ते अनुभव जगातील दोन मातब्बर संघासाठी विचित्र ठरले. तुम्ही जर इंग्लंड संघाला विचाराल की, ते ५० धावात ऑलआउट होऊ शकतील का? याचे उत्तर ते नाहीच असे देखील. तुम्ही समजू शकता की, एकाद्या दिवशी अशा घटना होत राहतात.'
तुम्ही काही करण्याचा प्रयत्नात असता, तेव्हा ते तुमच्या नियंत्रणाबाहेर जाते आणि काहीही ठीक होत नाही. अॅडिलेड कसोटीत असंचं घडलं. ४५ मिनिटाचा खेळ वगळता आम्ही त्या कसोटीत दबदबा निर्माण केलेला होता. ऑस्ट्रेलियात आम्ही आत्मविश्वासाने खेळ केला. ज्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना मदत मिळते. त्या ठिकाणी आम्ही चांगली कामगिरी केली. आम्ही ती कटू आठवण विसरून मेलबर्न कसोटीत विजय मिळवला. अॅडिलेडमध्ये ३६ धावांवर ऑलआउट झाल्यानंतर याचा परिणाम आम्ही आमच्या खेळावर होऊ दिला नाही, असे देखील विराट म्हणाला.
भारत-इंग्लंड मालिका बरोबरीत
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेली चार सामन्याची कसोटी मालिका सद्यघडीला १-१ अशा बरोबरीत आहे. उभय संघातील तिसरा सामना अहमदाबाद येथे दिवस-रात्र पद्धतीने खेळला जाणार आहे. २४ फेब्रुवारीपासून या सामन्याला सुरूवात होईल. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने महत्वाची आहे. या मालिकेच्या निकालावर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा दुसरा फायनलिस्ट मिळणार आहे. न्यूझीलंडचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पात्र ठरला आहे.