अबुधाबी- मराठा अरेबियन्सने डेक्कन ग्लोडिएटर्सचा ८ गडी राखून पराभव करत टी-१० लीग स्पर्धेचे जेतेपद पटकावले. अबुधाबीच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात डेक्कन ग्लेडिएटर्सने प्रथम फलंदाजी करत ८ बाद ८७ धावा केल्या होत्या. डेक्कनचे हे आव्हान मराठा अरेबियन्सने २ गड्याच्या मोबदल्यात ८ व्या षटकातच पूर्ण केले. चाडविक वाल्टनला सामनावीरचा तर ख्रिस लीनला (३७१ धावा) मालिकावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
मराठा अरेबियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा डेक्कनची सुरूवात खराब झाली. कर्णधार शेन वॉटसन (१), मोहम्मद शाहजाद (१४), आणि किरॉन पोलार्ड सारखे महत्वाचे खेळाडू स्वस्तात बाद झाले. डेक्कनची अवस्था ४ बाद ३५ अशी झाली होती. तेव्हा भानुका राजपकसा (२३) आणि आसिफ खान (२५) या जोडीने ३५ धावांची भागिदारी रचली. मात्र, मोक्याच्या क्षणी मराठा अरेबियन्सच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली. त्यामुळे डेक्कनचा संघ ८ बाद ८७ धावा करु शकला.