मुंबई - आयपीएल २०२० च्या यशस्वी आयोजनानंतर यूएईमध्ये टी-१० लीग स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेतील अबुधाबी आणि नॉर्थन वॉरियर्स यांच्यातील सामन्यादरम्यान, एक मजेशीर घटना घडली.
झाले असे की, या सामन्यातील दुसऱ्या डावात नॉर्थन संघातील लींडल सीमन्स आणि वसीम मोहम्मद फलंदाजी करत होते. दुसरीकडे अबुधाबी संघातील खेळाडू रोहन मुस्तफा हा सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी वॉरियर्सच्या फलंदाजाने जोरदार फटका मारला. सीमारेषेपार जाणारा चेंडू सहज अडवता आला असता, परंतु नेमका त्याचवेळी रोहन जर्सी बदलत होता. तरीही कसबसे अंगावरील कपडे सांभाळत तो चेंडूच्या मागे धावला. परंतु तोवर चेंडू सीमारेषेबाहेर गेला आणि फलंदाजाला चौकार मिळाला.
रोहनने प्रतिस्पर्धी वॉरियर्स संघाला चार धावा दान केल्या आणि या प्रकारानंतर कुणीच चिडलं नाही तर स्टेडियमवर एकच हशा पिकला. मुस्तफाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.