नवी दिल्ली - भारतीय फलंदाज अभिनव मुकुंद आणि माजी वेगवान गोलंदाज डोडा गणेश यांनी क्रिकेटमध्ये सामना करावा लागलेल्या वर्णभेदी वागणुकीबद्दल भाष्य केले आहे. या दोन क्रिकेटपटूंचे वक्तव्य कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लाइडच्या मृत्यूनंतर आले आहे. अमेरिकेतील एका पोलीस कोठडीत श्वेतवर्णीय अधिकाऱ्याच्या मारहाणीत फ्लाइडचा मृत्यू झाला. त्यानंतर अमेरिकेत हिंसक निषेध सुरू झाला आहे.
गणेशने मुकुंदची एक जुनी पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट मुकुंदने ट्विटरवर 2017मध्ये शेअर केली होती. त्या दिवसांत मुकुंदला वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला, असे गणेशने सांगितले आहे. गणेशने ट्विटरवर म्हटले, "अभिनव मुकुंदच्या कथेतून मला माझ्या खेळण्याच्या दिवसांत झालेल्या वर्णद्वेषी घटनांची आठवण झाली. फक्त एक भारतीय क्रिकेटपटू साक्षीदार होता. त्याने मला ताकद दिली. भारत आणि कर्नाटककडून 100 सामने खेळण्यापासून मला कोणीही थांबवू शकले नाही. "