मुंबई- आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा ८५ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. या पराभवानंतर भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याच्यासह अनेकांनी भारतीय संघाचे मनोबल उंचावण्यासाठी सांत्वनपर ट्विट केले. पण, एका पाकिस्तानी नागरिकाने चोप्राच्या त्या ट्विटवरून भारतीय संघाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चोप्रानेही त्याला जशाच तसे उत्तर देताना चांगलेच सुनावले.
हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर आकाश चोप्राने एक ट्विट केले. त्यात त्याने, भारताने विश्वकरंडक स्पर्धेत केवळ एकच पराभव पत्करला. तसा एक पराभव ऑस्ट्रेलियाचाही झाला. विशेष म्हणजे, दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध पराभूत झाले. भारताने सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. तर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने त्या पराभवाची परतफेड केली. यालाच आयुष्य म्हणतात, असे म्हटले.
पाकिस्तानच्या चाहत्याने त्या ट्विटवरुन चोप्रासह भारतीय संघाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चोप्राने, तुमच्या पुरूष आणि महिला संघानं चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर किती बाद फेरीची सामने खेळले? असा सवाल केला. तसेच त्याने काचेची घरं असलेल्यांनी दिवे लावून कपडे बदलू नये, असे सडेतोड उत्तर दिले. यामुळे पाकिस्तानच्या चाहत्याची बोलती बंद झाली.