बंगळुरू - चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताने पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाचा सात गडी राखून पराभव केला आहे. या विजयामुळे टीम इंडियाने ही मालिका २-१ ने खिशात टाकली. गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारताला हा विजय साध्य करता आला. या सामन्यात भारताकडून शतक नोंदवणाऱ्या रोहित शर्माला सामनावीर तर, मालिकेत भन्नाट फॉर्म राखणाऱ्या विराट कोहलीला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
हेही वाचा -रोहित शर्माच्या वनडेतील ९००० धावा पूर्ण
या मालिकेत दोन्ही संघांनी एक-एक असा विजय मिळवला असल्याने चिन्नास्वामीवर होणाऱ्या निर्णायक सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ९ बाद २८६ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे तीन फलंदाज गमावले. पाहुण्यांचा संघ फलंदाजी करत असताना धवनला दुखापत झाली. त्यामुळे रोहित शर्मासोबत फॉर्मात असलेला राहुल सलामीला आला. त्याने रोहितसह ६९ धावांची सलामी दिली. राहुलला फिरकीपटू अगरने १९ धावांवर पायचित पकडले. त्यानंतर मात्र, रोहित आणि कर्णधार विराटने संघाची धावगती वाढवली. रोहितने आक्रमक तर, विराटने संयमी फलंदाजी करत धावफलक हलता ठेवला. या सामन्यात ९००० एकदिवसीय धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या रोहितने ८ चौकार आणि ६ षटकारांसह ११९ धावांची शतकी खेळी साकारली. तर, विराटने ८ चोकारांसह ८९ धावा काढल्या. संघाला दोनशेपार पोहोचवल्यानंतर रोहित माघारी परतला. त्यानंतर, विराट आणि मुंबईकर श्रेयस अय्यरने संघाचा विजय निश्चित केला.अय्यरने ६ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४४ धावा केल्या.विराट बाद झाल्यानंतर मनिष पांडे आणि अय्यरने विजय साकारला. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवुड, अॅश्टन अगर आणि अॅडम झम्पाने प्रत्येकी एक बळी घेतला आहे.
तत्पूर्वी, स्टीव्ह स्मिथच्या १३१ धावांच्या वादळी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. स्मिथने आपल्या खेळीत १४ चौकार आणि एका षटकार लगावले. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि फिंच या सामन्यात अपयशी ठरले. शमीने वॉर्नरला ३ धावांवर बाद केले. तर, फिंच १९ धावांवर धावबाद झाला. त्यानंतर आलेल्या स्मिथ आणि लाबुशेनने संघाचा डोलारा सांभाळला. संघाची धावसंख्या १७३ असताना फिरकीपटू रविंद्र जडेजाने लाबुशेनला माघारी धाडले. ५ चौकारांसह लाबुशेनने ५४ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या अॅलेक्स कॅरीनेही ३५ धावांची छोटेखानी खेळी केली. कॅरीनंतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज तग धरू शकले नाहीत. शेवटच्या षटकात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाला तीनशेचा आकडा गाठता आला नाही. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ४ बळी टिपत कांगारूंच्या धावसंख्येला लगाम घातला. शमीव्यतिरिक्त जडेजाला २, तर कुलदीप यादव आणि नवदीप सैनीला प्रत्येकी एक बळी मिळाला आहे.