कोलंबो - विश्वकरंडक विजेत्या इंग्लंड संघाचा गोलंदाज लियाम प्लंकेट आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथी यांच्यासह एकूण ९३ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू लंका प्रीमियर लीगमध्ये (एलपीएल) भाग घेणार आहेत. एलपीएलचा पहिला हंगाम २८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज आणि वेस्ट इंडीजचा सलामीवीर ड्वेन स्मिथचादेखील या लीगच्या परदेशी खेळाडूंच्या यादीत समावेश झाला आहे.
दुबईतील स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंग कंपनीला एलपीएलचे पाच वर्षांसाठी सर्व हक्क देण्यात आले आहेत. या टी-२० लीगमध्ये पाच संघ असतील आणि चार आंतरराष्ट्रीय मैदानावर २३ सामने खेळवण्यात येतील. या लीगमध्ये भाग घेणार्या पाच संघांची नावे कोलंबो, केन्डी, गाले, डम्बुला आणि जाफना या शहरांच्या नावावरून असणार आहेत. लीगचा अंतिम सामना २० सप्टेंबर रोजी खेळला जाईल.