मुंबई -१८ जानेवारी २०१५ म्हणजे ५ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी क्रिकेटविश्वात मोठा विक्रम नोंदवला गेला होता. आणि या विक्रमाचा कर्ताधर्ता होता दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलीयर्स. जोहान्सबर्ग स्टेडियमवर डिव्हिलीयर्सने केलेल्या प्रतापाची दखल संपूर्ण जगाने घेतली होती.
हेही वाचा -बांगलादेशच्या ५ प्रशिक्षकांनी पाकिस्तानात जाण्यास दिला नकार
जोहान्सबर्ग स्टेडियमवर रंगलेल्या विंडीजविरूद्धच्या सामन्यात डिव्हिलीयर्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान शतक ठोकले होते. या सामन्यात त्याने १६ चेंडूत सर्वात वेगवान अर्धशतक आणि ३१ चेंडूत सर्वात वेगवान शतक केले होते. या सामन्यापूर्वी वेगवान शतकाचा मान न्यूझीलंडच्या कोरी अँडरसनने पटकावला होता. त्याने ३६ चेंडूत ही किमया केली होती.
१८ जानेवारी २०१५ रोजी एकदिवसीय मालिकेचा दुसरा सामना दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात डिव्हिलीयर्सने ४४ चेंडूत फलंदाजी करताना ९ चौकार १६ षटकारांच्या मदतीने १४९ धावा केल्या तर दक्षिण आफ्रिकेने निर्धारित षटकात दोन गडी गमावून ४३९ धावा केल्या. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ २९१ धावा करू शकला.