नवी दिल्ली -इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर मागच्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात वर्णद्वेषी वक्तव्याचा बळी ठरला होता. ज्याने हे कृत्य केले होते त्याला आता शिक्षा सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा -होबार्ट इंटरनॅशनल टुर्नामेंट : दोन वर्षानंतर सानियाने केलं दमदार 'कमबॅक'
या व्यक्तीवर न्यूझीलंडमध्ये देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. बे ओव्हल मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड या उभय संघात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी हे प्रकरण झाले होते. त्यानंतर ऑकलंड येथील रहिवासी असलेल्या २८ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती.
न्यूझीलंडचे क्रिकेट प्रवक्ते अँथनी क्रमी यांनी या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'या व्यक्तीला २०२२ पर्यंत न्यूझीलंडमध्ये आंतरराष्ट्रीय किंवा घरगुती सामने पाहता येणार नाहीत. शिवाय त्याला कारवाईला सामोरे जावे लागू शकते. संबंधित घटनेबद्दल आम्ही पुन्हा एकदा आर्चर आणि इंग्लंड टीम व्यवस्थापनाकडे दिलगिरी व्यक्त करतो. अशा प्रकारचे वर्तन पूर्णपणे अस्वीकार्य आहे', असे क्रमी यांनी म्हटले आहे.