मुंबई - रणजी करंडक स्पर्धेत यजमान मुंबई आणि कर्नाटक यांच्यात झालेल्या सामन्याला दोन सापांनी मैदानात हजेरी लावली. अजिंक्य रहाणे फिल्डिंग करत असतानाच त्याच्या शेजारी दोन साप आले. तेव्हा सापांना बाहेर काढण्यासाठी सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले.
घडले असे की, मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानात मुंबई विरुद्ध कर्नाटक यांच्यात रणजीचा सामना रंगला होता. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मैदानात दोन सापांनी हजेरी लावली. तेव्हा संकुल कर्मचाऱ्यांनी सर्पमित्रांना पाचारण केले. सर्पमित्रांनी तात्काळ धाव घेत दोनही सापांना पकडले. तेव्हा सामन्याला सुरूवात झाली.
दरम्यान, हा सामना कर्नाटकने ५ गडी राखून जिंकला. या सामन्यात कर्नाटकने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा मुंबईने प्रथम फलंदाजी केली. मात्र, कर्नाटकच्या गोलंदाजीसमोर मुंबईचा पहिला डाव १९४ धावांवरच संपुष्टात आला. त्यानंतर कर्नाटकला पहिल्या डावात २१८ धावा करता आल्या.
मुंबईची दुसऱ्या डावातही फलंदाजी अपयशी ठरली. त्यांनी दुसऱ्या डावात केवळ १४९ धावा केल्या. त्यामुळे कर्नाटकला विजयासाठी केवळ १२६ धावांची गरज होती. या धावा त्यांनी ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.
यापूर्वी सुरू असलेल्या रणजी हंगामातील विदर्भ विरुद्ध आंध्र प्रदेश सामन्यात सापाने मैदानात हजेरी लावली होती. विजयवाडा येथे झालेल्या सामन्यात दोन्ही संघाचे खेळाडू मैदानात आले. तेव्हा मैदानात सापाने हजेरी लावली. या सापाला बाहेर काढण्यासाठी ग्राउंड स्टाफने प्रयत्न केले आणि अखेर सापाला बाहेर काढल्यानंतर सामन्याला सुरुवात झाली होती.