कोलकाता- आयसीसी टी-२० विश्व करंडक स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात सिलिगुडीची १६ वर्षीय ऋचा घोषने स्थान पटकावले आहे. भारताच्या महिला संघासोबत ती पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर जाणार आहे.
ऋचा भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरची फॅन आहे. पण तिला महेंद्रसिंह धोनीसारखे षटकार ठोकणे आवडते. निवडीनंतर ऋचा म्हणाली, 'मी कधी विचारही केला नव्हता की इतक्या लवकर मला भारतीय संघात संधी मिळेल. माझा यावर विश्वास ठेवणे कठिण आहे. मी अजूनही या सुखद धक्क्यातून सावरले नाही. माझे पहिले आदर्श माझे वडील आहेत. ज्यांच्याकडून मी क्रिकेट शिकले. त्यानंतर सचिन तेंडुलकर माझे नेहमीच आदर्श राहतील.'
षटकार मारण्याची जेव्हा चर्चा होते, तेव्हा ऋचा धोनीच्या नावाला पसंती देणे. धोनी ज्या पद्धतीने षटकार मारतो ते मला आवडते. मी सुद्धा असा षटकार मारण्याचा प्रयत्न करते. गोलंदाज कोणीही असो जोपर्यत तुमच्या हातात बॅट असते तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकता, असे धोनीची मोठी चाहती असलेली ऋचा म्हणाली.