नवी दिल्ली -भारतीय महिला संघाची दिग्गज खेळाडू मिताली राजने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच, संघात एका १५ वर्षीय युवा खेळाडूचा समावेश झाला आहे. हरियाणाच्या शफाली वर्माची आगामी दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे.
हेही वाचा -रहमत शाह ठरला अफगाणिस्तानचा पहिला 'शतकवीर'
मितालीने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर, गुरुवारी बीसीसीआयच्या मुख्यालयात झालेल्या निवड समितीच्या बैठकीत एकदिवसीय व टी -२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ निवडण्यात आला. शफालीने महिला टी-२० चॅलेंजर स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली होती. या स्पर्धेत तिने नागालँडविरुध्द ५६ चेंडूत १२८ धावा चोपल्या होत्या. तिचे वय आणि कामगिरी पाहता भारतीय संघात पदार्पण हा शफालीसाठी कौतुकाचा विषय ठरला आहे.
तीन सामन्यांच्या मालिकेसाठी एकदिवसीय संघाचे नेतृत्व मितालीकडे आहे. तर, हरमनप्रीत कौरकडे पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे.
३६ वर्षीय मिताली आता एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेवर लक्ष देणार आहे. तिने ३२ टी-२० सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये तीन टी-२० विश्वकरंडक स्पर्धांचा समावेश आहे. तिने २०१२, २०१४ आणि २०१६ च्या टी -२० विश्वकरंडक स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. मात्र, तिच्या नेतृत्वाखाली भारताने एकदाही विश्वकरंडक उंचावलेला नाही.
एकदिवसीय संघ-
- मिताली राज (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर, पूनम राऊत, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, मानसी जोशी, एकता बिश्त, पूनम यादव, डी. हेमलता, राजेश्वरी गायकवाड, प्रिया पूनिया.
टी-२० संघ-
- हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया, पूनम यादव, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्रकार, वेदा कृष्णमूर्ती, हरलीन देवल, अनुजा पाटील, शफाली वर्मा, मानसी जोशी, राधा यादव.