मुंबई - देशभरात पसरलेल्या कोरोना विषाणूशी लढण्यासाठी केंद्र आणि संबंधित राज्य सरकारच्या यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. मात्र या रोगावर अद्याप औषध सापडले नसल्यामुळे, जगभरातील वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरु आहेत. अशात पंतप्रधान नरेद्र मोदींनी कोरोनाविरोधात लढण्यासाठी मदतीचे आवाहन केलं आहे. त्यांच्या आवाहनानंतर विविध क्षेत्रातून मदतीचा ओघ येत आहे. यातच भारताची १५ वर्षाची नेमबाज इशा सिंह हिने या कठीण काळात आपलं सामाजिक भान जपलं आहे.
इशा सिंहने रविवारी ३०,००० रुपयांची मदत दिली आहे. यासंदर्भात तिने सोशल मीडियावर ट्विट केलं आहे आणि माझ्या सेव्हिग्समधून ३०,००० रुपयांचा निधी देत असल्याचे तिने सांगितलं आहे.
इशाच्या मदतीवर केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी इशाचं कौतुक केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, '१५ वर्षांची असतानाही तू मदतीसाठी पुढे आलीस याबद्दल तुझं कौतुक आहे. तू रिअल चॅम्पियन आहेस.'
दरम्यान याआधी एका अडीच वर्षाच्या मुलीनेही मोदींना मदत केल्याचं समोर आलं आहे. त्या चिमुरडीने आपल्या पिगी बॅग्समधील पैसे देत असल्याचं सांगितलं आहे.