कोल्हापूर - मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या आयपीएलच्या क्रिकेट सामन्यात मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर इचलकरंजी शहरात शनिवारी (ता. १) रात्री क्रिकेटप्रेमींनी जनता चौकात विजयाचा जल्लोष केला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच अशाप्रकारे युवकांनी एकत्र येत जल्लोष केल्याने स्थानिकांमधून कारवाईची मागणी होत आहे. सामन्यानंतर चाहत्यांनी केलेल्या जल्लोषाचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शहरात कडक लॉकडाऊन तरीही नियमांचे उल्लंघन
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरात कडक लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. असे असतानाच शनिवारी (ता. १) रात्री मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात क्रिकेट सामना रंगला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवताच रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई इंडियन्स संघाला सपोर्ट करणाऱ्या युवकांनी इचलकरंजी शहरातील मुख्य चौक असलेल्या जनता चौकात विजयाच्या घोषणा देत जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.