मेलबर्न - कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारताला जगभरातून मदतीचा ओघ येत आहे. यामध्ये आता ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाची भर पडली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानेही मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना टेस्ट आणि ऑक्सिजनसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मदत जाहीर केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जवळपास ३७ लाख रुपयांची मदत केली आहे.
देशात दिवसागणिक कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. मागील काही दिवसांपासून देशात दररोज तीन लाखाहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे आरोग्य व्यवस्था कोळमडली आहे. अशात क्रिकेट ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियाई क्रिकेटर्स असोसिएशन आणि यूनिसेफ ऑस्ट्रेलिया भारतातील कोरोनाच्या लढ्यासाठी मदतीला सरसावले आहेत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकले म्हणाले की, 'ऑस्ट्रेलियन आणि भारतीयांचे एक वेगळं नात आहे. क्रिकेटमुळे दोन्ही देश जोडले गेले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आम्ही भारतासोबत आहोत. शक्य तितकी मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. भारतातील लोकांच्या दुखा:त आम्ही सहभागी आहोत.'