हैदराबाद: रविवारी बीसीसीआयने इंग्लंड विरुद्धच्या एकमात्र कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. ज्यामध्ये भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला ( Veteran batsman Cheteshwar Pujara ) संधी देण्यात दिली आहे. भारतीय कसोटी संघात निवड झाल्यानंतर चेतेश्वर पुजाराने आपल्या पुनरागमनावर प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये त्याने भारतीय संघातून वगळण्यात आल्यानंतर आयपीएलमध्ये ही कोणत्या संघाने खरेदी न करण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अनुभवी भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराला इंडियन प्रीमियर लीग ( IPL ) 2022 साठी कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. पुजाराला आयपीएलमध्ये खरेदी न केल्याची खंत नाही. त्याच्या मते हे त्याच्यासाठी वरदान ठरले आहे. पुजाराची श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेसाठी निवड झाली नव्हती. ज्यामुळे त्याची कसोटी कारकीर्द संपल्याचे दिसत होते. मात्र, कौंटी चॅम्पियनशिपमध्ये धावांचा पाऊस पाडल्यानंतर पुजाराने भारतीय संघात पुनरागमन केले आहे.
आयपीएलमध्ये न खेळणे वरदान ठरले -
भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर पुजाराने आयपीएलमध्ये न खेळणे आपल्यासाठी वरदान ठरल्याचे म्हटले आहे. त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले असते, तरी त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नसती, असे पुजाराचे मत आहे. पुजारा एका वृत्तसंस्थेला बोलताना म्हणाला, ''जरी मला आयपीएलच्या कोणत्या संघाने विकत घेतले असते, तरी मला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नसती. फक्त नेटमध्ये जाऊनच सराव करावा लागला असता. नेटमध्ये सराव करणे आणि सामना खेळणे यात मोठा फरक आहे. त्यामुळेच मी काउंटीला हो म्हणालो. मी काउंटीला हो म्हणालो कारण मला माझ्या जुन्या लयीत परत यायचे होते.''