वर्सेस्टर: इंग्लंच्या कसोटी संघाचा कर्णधार नियुक्त केल्यानंतर अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने ( All-rounder Ben Stokes ) धमाकेदार अंदाजात मैदानात पुनरागमन केले आहे. कौंटी क्रिकेटमध्ये डरहॅमकडून खेळताना या अष्टपैलू खेळाडूने आपल्या पहिल्याच सामन्यात शानदार फलंदाजी केली. त्याने वॉर्कस्टरशायर विरुद्ध ( Worcestershire vs Durham ) अवघ्या 64 चेंडूत धडाकेबाज शतक झळकावले. त्यामुळे डरहॅम संघाने 128 षटकांत 6 बाद 580 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला.
एकावेळीस स्टोक्स 59 चेंडूत 70 धावा करुन फलंदाजी करत होता. यानंतर त्याने वूस्टरशायरचा डावखुरा फिरकी गोलंदाज जोश बेकरच्या ( Left-arm spinner Josh Baker ) एका षटकात सलग पाच षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. तसेच त्याने या षटकात एक चौकार मारून एकूण 34 धावा केल्या. उपाहारापर्यंत स्टोक्सने 82 चेंडूत 147 धावा केल्या होत्या. बेन स्टोक्सने डावाच्या सुरुवातीला सावध खेळ करत 47 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण पुढील 50 धावांसाठी त्याने केवळ 17 चेंडूंचा सामना केला. त्यानंतर बेन स्टोक्सने 88 चेंडूत 8 चौकार आणि 17 षटकारांच्या मदतीने 161 धावा केल्या.