लंडन - वर्ष २०१६ आयसीसी विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजचा खेळाडू कार्लोस ब्रेथवेट याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज बेन स्टोक्सला अखेरच्या षटकात ४ षटकार खेचत विंडिज संघाला विश्वकरंडक जिंकून दिला होता. विंडीजला अखेरच्या षटकात विजयासाठी १९ धावांची गरज होती. तेव्हा ब्रेथवेटने बेन स्टोक्सला ४ षटकार खेचले होते. त्याचे षटकार पाहून बेन स्टोक्स खेळपट्टीवर हताश होऊन बसला होता. हा क्षण त्यासाठी एका वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हता. पण आता बेन स्टोक्सने ब्रेथवेटचा तो हिशोब चुकता केला आहे.
इंग्लंडमध्ये सद्या टी-२० ब्लास्ट स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेत बेन स्टोक्स आणि कार्लोस ब्रेथवेट समोरा-समोर आले. पण यावेळी बेन स्टोक्सच्या हाती बॅट होती तर ब्रेथवेटकडे चेंडू होता. शनिवारी (२६ जून) डरहम आणि बर्मिंघन यांच्यात झालेल्या सामन्यात स्टोक्सने ब्रेथवेटच्या गोलंदाजीवर २ चौकार आणि २ षटकार लगावले. त्याने ८ चेंडूत २० धावा करत त्या कटू आठवणींना मलम लावलं. स्टोक्सने ब्रेथवेटच्या एका षटकात २ षटकार आणि १ चौकारासह १६ धावा वसूल करत आपला मागील हिशोब चुकता केला. या सामन्यात बेन डरहम संघाकडून खेळत होता. तर ब्रेथवेट बर्मिघमचा खेळाडू होता. डरहम संघाने उभय संघातील सामना २२ धावांनी जिंकला.