नवी दिल्ली : बीसीसीआयने 20 संभाव्य अष्टपैलू खेळाडूंना बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे जवळपास तीन आठवड्यांच्या शिबिरासाठी बोलावले आहे. या खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचाही समावेश आहे. अर्जुन हा गोव्यासाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. तसेच त्याने गेल्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले होते. एनएसएचे हे शिबिर ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
अष्टपैलू खेळाडू विकसित करण्याचा उद्देश : बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने सांगितले की, या वर्षाच्या शेवटी इमर्जिंग आशिया चषक (U-23) आहे. त्या दृष्टीने बीसीसीआय संभाव्य युवा खेळाडूंकडे लक्ष देत आहे. अष्टपैलू खेळाडूंचे शिबिर ही एनएसएचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांची कल्पना आहे. सर्व फॉरमॅटमध्ये अष्टपैलू खेळाडू विकसित व्हावे, हा या मागचा उद्देश आहे. वरिष्ठ राष्ट्रीय निवड समितीने शिव सुंदर दास यांच्या अध्यक्षतेखालील कामगिरी आणि क्षमतेच्या आधारे खेळाडूंची निवड केली आहे.
'या' खेळाडूंची निवड झाली : शिबिरासाठी निवड करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये काही उल्लेखनीय नावांचाही समावेश आहे. सौराष्ट्रचा डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन साकारिया याची शिबिरासाठी निवड झाली आहे. तो या आधी 2021 मध्ये भारताकडून खेळला आहे. तसेच तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळतो. पंजाबचा डावखुरा फलंदाज अभिषेक शर्माचीही शिबिरासाठी निवड झाली आहे. त्याने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी चांगली कामगिरी केली आहे. तेंडुलकरशिवाय गोव्याचा ऑफस्पिनर मोहित रेडकरलाही शिबिरात बोलावण्यात आले असून राजस्थानच्या मानव सुथारलाही या यादीत स्थान मिळाले आहे. दिल्लीकडून वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि मध्यमगती गोलंदाज दिविज मेहरा हे दोन खेळाडू आहेत. हे दोघेही चांगले फलंदाज आहेत.
अर्जुन तेंडुलकरची निवड का? : अर्जुन तेंडुलकरच्या निवडीमागील कारण विचारले असता, बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, 'अर्जुनने तीन आयपीएल सामने खेळले आहेत. त्यात त्याने बऱ्यापैकी कामगिरी केली आहे. रणजी ट्रॉफीत आधीच त्याच्या नावावर शतक आहे. तो एक डावखुरा वेगवान गोलंदाज आहे जो 130 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो. अशाप्रकारे तो संघामध्ये विविधता आणतो.'
हेही वाचा :
- WTC Final : भारताचे स्वप्न धुळीला मिळाले, फायनलमध्ये 209 धावांनी पराभव
- WTC Final : रोहित शर्माने पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडले, जाणून घ्या काय म्हणाला..